Shirdi Ram Navami Utsav 2024| साईंच्या शिर्डीत रामनवमीचा उत्साह!

Shirdi Ram Navami Utsav 2024: यावर्षी दिनांक 16 ते 18 एप्रिल 2024 असे 3 दिवस श्री राम नवमी उत्सव शिर्डी साईबाबा संस्थानामार्फत साजरा केला जाणार आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिरात रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. देश विदेशातून लाखो साई भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहेत. यंदाच्या 113 व्या रामनवमी उत्सवानिमित्त 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमीला शिर्डीचे साई बाबा मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार आहे.

Shirdi Ram Navami Utsav 2024
Shirdi Ram Navami Utsav 2024- Image Credit: Shri Saibaba Sansthan Trust

हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या नवमी तिथीला श्रीराम नवमी साजरी केली जाते. यंदा 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमी साजरी केली जाईल. प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार असून हिंदू धर्मात राम नवमी या सणाला विशेष महत्त्व आहे. रामाचा जन्मोत्सव भारतात ठिकठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात असतो. प्रभु श्रीरामाच्या जन्माने व जीवनाने संपूर्ण मानव जातीला मार्गदर्शन लाभलेले आहे.

Shirdi Ram Navami Utsav 2024: शिर्डीत रामनवमी उत्सव साजरी करण्याची कथा

साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी, गुरुपौर्णिमा आणि विजयादशमी हे तीन प्रमुख सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरे केले जात असतात. पूजा, भजन,  सार्वजनिक पारायण, पालखी सह अनेक कार्यक्रम या निमित्ताने केले जातात. रामनवमीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुले असते.

Shirdi Ram Navami Utsav 2024

1897 च्या दरम्यान गोपाळराव गुंड नावाचे साईबाबांचे एक भक्त होते. बरेच वर्षे त्यांना मुलबाळ होत नव्हते. शेवटी बाबांच्या आशीर्वादाने त्यांच्या घरी पाळणा हलला. साईबाबांच्या आशीर्वादाने आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाला अशी त्यांची धारणा होती आणि या आनंदाच्या निमित्ताने दरवर्षी शिर्डीत साईबाबांचा उरूस भरवावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ही इच्छा त्यांनी लोकांजवळ बोलून दाखवली आणि सर्वांना ही कल्पना देखील आवडली. उरूस भरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागत होती.

शिर्डी गावातील काही विघ्न संतोषी लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कान भरले आणि उरूस भरवायला जिल्हाधिकाऱ्यांनी आधी नकार दिला परंतु लोकांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले. शेवटी गावकऱ्यांची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली आणि उरूस भरवायचे नक्की झाले. सर्व साई भक्तांनी साईबाबांना ही आनंदाची बातमी सांगितली. साईबाबांनी श्रीराम नवमी हा दिवस उरूस भरवण्यासाठी ठरवला. खरंतर उरूस हा सण मुस्लिम संतांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जाणारा आहे. संपूर्ण शिर्डी गावातून बाबांची पालखी निघाली. पुढील पंधरा वर्षे रामनवमीच्या दिवशी शिर्डीत बाबांचा उरूस भरत राहिला.

Shirdi Ram Navami Utsav 2024

1912 पर्यंत ही प्रथा याच पद्धतीने सुरू होती. साईबाबांचे आणखी एक भक्त कृष्णराव जोगेश्वर भीष्म यांना एक नवीन कल्पना सुचली. रामनवमी हा भगवान श्रीरामांचा जन्मदिवस. या दिवशी शिर्डीत राम जन्माचा उत्सव साजरा करावा अशी कल्पना त्यांनी काका महाजन यांना सुचवली. साईबाबांनी देखील रामजन्माचा सोहळा साजरा करण्याची अनुमती सर्व साई भक्तांना दिली आणि सर्वांना अधिक आनंद झाला. अशाप्रकारे साईबाबांच्या उरुसाला रामनवमी सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. दरवर्षी शिर्डीत रामनवमी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

हेही वाचा: श्रीरामरक्षा स्तोत्र पठाणाचे हे आहेत चमत्कारिक फायदे!

Shirdi Ram Navami Utsav 2024: अशी झाली उत्सवाची सुरवात

उत्सवाची सुरुवात पहाटे साईंच्या काकड आरतीनं झाली. परंपरेप्रमाणे साई मंदिरातून साईची प्रतिमा, विणा आणि पोथीची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी संस्थानाचे समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पोथी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवले हे प्रतिमा घेऊन सहभागी झाले. वाजत गाजत ही मिरवणूक द्वारकामाईत पोहोचल्यानंतर इथं साईचरित्राच्या अखंड पारायणास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रथम अध्यायाचे वाचन समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केलं.

Shirdi Ram Navami Utsav 2024:

भाविकांनी कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या पाण्याची विधिवत पूजा करून साईमूर्ती आणि साई समाधीला जलाभिषेक करण्यात आला होता. साईबाबांना मंगल स्नानही कावडीतून आणलेल्या जलाने करण्यात आले.

शेकडो पालख्या होतात दाखल

रामनवमीच्या दिवशी उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालख्या घेऊन दाखल होत असतात. रामनवमी उत्सव आणि पालखीचे एक वेगळ नातं असल्याने या उत्सवासाठी खास करून मुंबईहून मोठ्या प्रमाणात पालख्या दाखल होत असतात. 15 ते 20 दिवसांचा पाई प्रवास करून शिर्डीत येऊन त्यांच्या दर्शनासाठी भाविका आतूर झालेले असतात. आजही साईंच्या शिर्डीत राम नवमीचा उत्सव तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो.

रामनवमीनिमित्त शिर्डीतून काढली जाते मिरवणूक

रामनवमीचा उत्सव आणि परंपरा जोपासण्यासाठी या उत्सवात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल होत असतात. मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत या प्रमुख शहरांच्या बरोबरीनेच अनेक गावातून शिर्डीला लाखो भाविक पायी चालत येत असतात. साई नामाच्या गजराननं संपूर्ण शिडी दुमदुमून गेलेली असते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी साईंच्या पालखीची गावातून मिरवणूक काढली जाते. उत्सवाच्या निमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येते.

साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आकर्षक देखावा

रामनवमी उत्सवानिमित्त मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीने साईबाबा मंदिराच्या चार नंबर प्रवेशद्वारासमोर प्रभू रामचंद्र, माता सीता, लक्ष्मण आणी हनुमान यांची मूर्ती असलेला पन्नास फुटी देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेतोय. मुंबई येथील द्वारकामाई मित्र मंडळाने स्वखर्चाने ही प्रतिकृती साकारली.

साईंचे मंदिर रात्रभर राहणार खुले

रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल होत असतात. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी भाविक आतुर झालेले असतात. हा उत्सव भाविकांसाठी आनंद सोहळा असतो. जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे.

Shirdi Ram Navami Utsav 2024: शिर्डी येथील साईंच्या मंदिराचे महत्त्व

साई बाबांचे मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी गावात आहे. शिर्डी म्हणजे साईंची पवित्र भूमी. शिर्डी मध्ये साईबाबांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना शिर्डीचे साईबाबा असे ओळखले जाते. साईबाबांनी शिर्डीमध्ये साठ वर्षे राहून मानव जातीची सेवा केली. इथूनच जगाला मानवता, कल्याण आणि एकात्मतेची अमूल्य शिकवण साईबाबांनी दिली. साईबाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत साहेबांनी श्रद्धा आणि सबुरीचा अनमोल मंत्र दिला.

भारतासह संपूर्ण जगभरात साईबाबांचे भाविक आहेत. साईबाबांच्या शिकवणी मध्ये सर्व धर्मांच्या तत्त्वज्ञानाचे मिश्रण होते. सर्व धर्मांच्या एकतेवर, निस्वार्थ सेवा, दान आणि प्रेमाचे महत्त्व यावर भर देण्यात आलेला होता. त्यांच्या सखोल ज्ञानामुळे आणि चमत्कारांमुळे त्यांची कीर्ती सर्वदूर पोहोचलेली होती. दरवर्षी लाखो भाविक शिर्डीच्या साईबाबा मंदिराला भेट देत असतात. साईबाबांच्या मंदिराची निर्मिती 1922 मध्ये करण्यात आल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या स्थापत्य कलेमध्ये हिंदू आणि इस्लामिक शैलींचा मिलाप आढळून येतो. साईबाबांच्या मुख्य मंदिरातील गाभारा हा सोन्याने मडवला असून मंदिराचा कळस देखील सोन्याचा आहे. साईबाबांचे मुख्य मंदिरात साईबाबांची एक ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसलेली मूर्ती आहे. मंदिराच्या गर्भगृहात भक्ती, शांतता आणि प्रसन्नतेचे वातावरण असते. साईंच्या मंदिरात विविध विभाग आहेत. समाधी मंदिर,  प्रार्थना आणि दर्शनासाठी प्रशस्त सभामंडप आणि सामूहिक पूजा आणि बचनासाठी एक हॉल आहे.

साईबाबांनी सबका मालिक एक है असा संदेश सर्वच भक्तांना दिलेला आहे. तर गुरुवारी शिर्डी मध्ये साईबाबांची पालखी निघते या पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची रखडलेली कामे, दुःख दूर होत असतात असे मानले जाते.

Shirdi Ram Navami Utsav 2024 FAQ:

1) साईबाबांचे मूळ मंदिर कोठे आहे?

साई बाबांचे मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी गावात आहे.

2) शिर्डीला रेल्वे स्टेशन आणि विमानतळ आहे का?

होय.

Leave a comment