गणपती बाप्पा बुद्धीची, विविध कलांची आणि प्रेरणा देणारी देवता असून कोणत्याही शुभ कार्याची सुरवात ही गणरायांच्या नामस्मरणाने केली जाते.
प्राचीन काळापासून गणेशाचे पूजन, आराधना आणि उपासना सुरू आहे. लहान बालकांपासून ते वयोवृद्ध माणसांमध्ये चैतन्य निर्माण करणारा गणराया सर्वांना हवा हवासा वाटतो.
महाराष्ट्रातील बहुतांश घरात, खाजगी व सरकारी कार्यालयात, तसेच इत्यादि ठिकाणी गणपती बाप्पाचा फोटो किंवा मुर्ती पहायला मिळते. गणेश उत्सवाच्या काळात घरोघरी गणेश मुर्तीची स्थापना केली जाते.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न असतो गणपतीची मुर्ती डाव्या सोंडेची असावी की उजव्या सोंडेची? उजव्या सोंडेच्या गणपती बद्दल बऱ्याच अपसमजुती देखील आहेत.
डावी दिशा म्हणजे वाम किंवा उत्तर बाजु. गणपतीची सोंड मध्यापासून डावीकडे वळाली असेल (गणपतीची डावी तर बघणाऱ्याची उजवी बाजु) तर त्याला डाव्या सोंडेचा गणपती म्हणतात.
डाव्या सोंडेचा गणेशा सर्वसाधारण असून या गणेशाची पुजा गृहस्थाश्रम, सुख, समृद्धी, आणि शांततेसाठी केली जाते. या गणपतीची पुजा घरगुती, सोप्या पद्धतीने करता येते. कठोर नियम लागू होत नाहीत.
उजव्या सोंडेचा गणपती (गणपतीची उजवी तर बघणाऱ्याची डावी बाजु) दक्षिणमुखी गणपती म्हणून ओळखला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्यामुळे हा गणपती थोडा कठोर मानला जातो.
उजव्या सोंडेच्या गणपतीची संपूर्ण सोवळ्याने पुजा करावी लागते. पुजा करताना लाल वस्त्र परिधान करणे, ज्या घरात हा गणपती असतो त्या घराला कधीही कुलूप नसणे, असे अनेक कठोर नियम आहेत.
गणपती डाव्या सोंडेचा असो की उजव्या सोंडेचा, गणपतीची पुजा मनपूर्वक, भक्तिभावाने आणि श्रद्धेने करणे आवश्यक आहे. देव कधीच आपल्या भक्तांचे वाईट करीत नाही.