Ganesh Jayanti 2024: ह्या वर्षी मंगळवारी दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येत असतो.
गणेश जयंती
Ganesh Jayanti 2024: गणेश जयंती का साजरी करतात?
गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्म दिवस आपण साजरे करत असतो. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी “पुष्टीपती विनायक जयंती” म्हणून आपण साजरा करतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी म्हणून पार्थिव पूजन करून साजरा केला जातो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून साजरा करतात.
असे म्हणतात गणपती बाप्पाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यप यांच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव आपण साजरा करतो. या चतुर्थीला तीलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या चतुर्थी प्रमाणेच माघ महिन्यातील गणेश जयंती म्हणजेच विनायक चतुर्थीला देखील तितकेच महत्व असते.
![Ganesh Jayanti 2024](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/02/ganesh-1024x1024.jpg)
Ganesh Jayanti 2024: गणपती बाप्पाचा वाढदिवस सर्वीकडे जोश व उत्साहात साजरा केला जातो. माघ शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते. या दिवशी गणपती बाप्पाला तिळाच्या लाडूंचा नैवद्य दाखविला जातो.
Ganesh Jayanti 2024: माघ महिन्यातील गणेश पूजन कसे करावे?
गणेश जयंतीच्या दिवशी करावयाचे गणेश पूजन हे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला केले जाणारे गणेश पुजनासारखेच असते. या दिवशी पाण्यात तीळ घालून त्या पाण्याने स्नान करण्याची प्रथा आहे. गणेश जयंतीला उपवास करायचा असतो.
आपण गणेश चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन करतो. त्यामुळे गणेश मूर्ती ही मातीची असते. या दिवसात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वी मातेविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील गणेश पूजन हे मातीच्या गणेश मूर्तीचे केले जाते.
![Ganesh Jayanti 2024](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/02/ganpati-bappa-768x1024.jpg)
माघ महिन्यातील गणेश जयंतीला धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेश मूर्तीची पूजा करायची असते. मूर्ती नसली तर प्रतिमा देखील चालते, भाव महत्वाचा असतो. पुष्प, धूप, दीप, नैवद्य, गंध, मंत्र इत्यादी सामग्री पूजेसाठी असते. यादिवशी पत्री अर्पण न करता दूर्वा अर्पण करतात. पुरणाच्या मोदकांच्या ऐवजी तीळसाखरेचा मोदकांचा प्रसाद अर्पण करतात.
Ganesh Jayanti 2024: गणेश जयंती व गणेश चतुर्थी यामधला फरक
गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी यांच्यातील फरक असा आहे की गणेश चतुर्थी भाद्रपद महिना शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात साजरी केली जाते. तर गणेश जयंती माघ महिन्यात साजरी केली जाते (इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात साजरी केली जाते).
परंपरेनुसार माघी गणेश जयंती हा गणपती बाप्पाचा जन्म दिवस म्हणून आपण साजरा करतो. स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेश चतुर्थीची सुरुवात केली.
![Ganesh Jayanti 2024](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/02/ganapati-771x1024.jpg)
हेही वाचा: प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेले पशुपतिनाथ व्रत कसे करावे
Ganesh Jayanti 2024: माघी गणेश जयंती तारीख आणि मुहूर्त
चतुर्थी तिथी: १२ फेब्रुवारी २०२४ ला संध्याकाळी ०५:४४ वाजेपासून १३ फेब्रुवारी २०२४ दुपारी ०२:४१ वाजेपर्यंत
गणेश पूजा मुहूर्त: १३ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११:४० वाजेपासून दुपारी ०१:५८ वाजेपर्यंत
गणेश आरती म्हणताना ह्या चुका करू नका
गणपती बाप्पाची आरती सहसा बऱ्याच घरात होत असते. गणेश चतुर्थीला अवर्जून आपण गणेश आरती म्हणत असतो किंवा ऐकत असतो. परंतु बऱ्याच वेळा काही लोक पुढे दिलेल्या शब्दांमद्धे गडबड करतात, त्या चुका नको व्हायला म्हणून संपूर्ण आरती नक्की वाचा.
चूक नं.१
दास रामाचा, वाट पाहे सदना|
बरेच व्यक्ति सदना न म्हणता सजना असे म्हणतात.
चूक नं.२
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
बरेच व्यक्ति संकटी न म्हणता संकष्टी असे म्हणतात.
गणपती आरती
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
संपूर्ण गणपती स्तोत्र
नारद उवाच
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम् आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम् ॥३॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशे तु गजाननम् ॥४॥
द्वादशेतानि नामानि त्रियेसंध्यां य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||
![Ganesh Jayanti 2024](https://marathitv.in/wp-content/uploads/2024/02/ganesha-1024x1024.jpg)
Ganesh Jayanti 2024: म्हणून गणेशजींना मोदक प्रिय आहेत
गणेश चतुर्थी असू द्या किंवा संकष्ट चतुर्थी असू द्या आपण प्रत्येक जण गणपती बाप्पांना 21 मोदकांचा नैवेद्य नक्की दाखवतो. मोदक जसे गणपतींना प्रिय आहेत तसेच ते लहान मुलांपासून वयस्कर लोकांनादेखील प्रिय आहे. गणपतीला मोदक का प्रिय आहेत त्याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत.
असे म्हणतात की एकदा भगवान शंकर झोपलेले होते आणि गणेशजी दरवाजावर पहारा देत होते. तेथे परशुराम पोहोचले आणि गणपतीने त्यांना थांबवले. यामुळे परशुराम चिडले आणि दोघांमध्ये लढाई सुरू झाली. जेव्हा परशुराम पराभूत होऊ लागले तेव्हा त्यांनी भगवान शंकरांनी दिलेल्या परशुने गणपतींवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे गणेशजींचा एक दात तुटला. तुटलेल्या दातांमुळे त्यांना खूप वेदना जाणवू लागल्या आणि खाण्यापिण्यात त्रास होऊ लागला. मग त्यांच्यासाठी मोदक तयार करण्यात आले. कारण मोदक खूप मऊ असतात. मोदक खाल्ल्याने त्यांचे पोट भरले आणि ते खूप आनंदी झाले. तेव्हापासून गणपतींना मोदक खूप आवडतात.
दुसऱ्या कथेनुसार एकदा भगवान शंकर, माता पार्वती आणि गणेशजी हे माता अनुसुयाच्या घरी गेले होते. त्यावेळी गणपती, भगवान शंकर आणि माता पार्वती या तिघांना खूप भूक लागली होती. माता अनुसुयाने विचार केला की आधी मी गणपतीला खाऊ घालते त्यानंतर मी भगवान शंकर आणि माता पार्वतीला खाऊ घालेल. जेव्हा माता अनुसुयाने गणपतीला खाऊ घालायला सुरुवात केली तेव्हा गणपती बऱ्याच वेळ खात राहिले पण त्यांची भूक काही शांत होत नव्हती.
मग माता अनुसुयाने विचार केला की काहीतरी गोड खाल्ल्याने त्यांची भूक शमू शकते. मग माता अनुसुयाने गणपतीसाठी मिठाईचा तुकडा आणला आणि मिठाई खाल्ल्याबरोबर गणेशजींच पोट भरलं. त्याचवेळी महादेवांनी 21 वेळा जोरजोरात ढेकर दिले आणि त्यांचे पोट भरल्याचे सांगितले. त्यानंतर देवी पार्वतीने अनुसुया मातेला त्या मिठाईचे नाव विचारले. माता अनुसयाने सांगितले की त्याला मोदक म्हणतात. तेव्हापासून गणपतीला मोदक अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. असे म्हंटले जाते की, जर गणपतीला 21 मोदक अर्पण केले गेले तर सर्व देवतांचे पोट भरते. यासह गणपती आणि इतर सर्व देवतांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात.
हेही वाचा: संकष्ट चतुर्थी का साजरी केली जाते?
गणपतीला 21 दुर्वा का वाहिल्या जातात?
Ganesh Jayanti 2024: एकदा अनलासूर नावाच्या राक्षसाने ऋषीमुनी आणि देवता यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंती नंतर गणपतीने त्या आसुराला गिळून टाकले. यामुळे गणेशजींच्या पोटात जळजळ होऊ लागली गणरायाचा त्रास कमी व्हावा यासाठी अनेक ऋषीमुनी यांनी प्रयत्न केले मात्र कशानेच गणेशजींच्या पोटातील दाह कमी होत नव्हता. अशावेळी 88 सहस्त्रमुनिंनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 जुडी गणेशाला खाण्यास दिल्या. दूर्वा खाल्ल्यानंतर गणेशजींच्या पोटातील जळजळ कमी झाली. यानंतर आनंदी होऊन, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे वरदान गणेशजींनी दिले.
(Disclaimer: या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित आहे)
Ganesh Jayanti 2024: FAQ
१.गणेश जयंती व गणेश चतुर्थी यामधला फरक काय?
गणेश चतुर्थी भाद्रपद महिना शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात साजरी केली जाते. तर गणेश जयंती माघ महिन्यात साजरी केली जाते (इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात साजरी केली जाते).
२.गणेश जयंतीला कशाचा नैवेद्य अर्पण करतात?
तिळाचे लाडू किंवा तिळगुळ यांचा नैवेद्य अर्पण करतात.
३.गणेश जयंती किंवा गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शन करतात का?
नाही.
४.अष्टविनायक गणपतीचे नाव व ठिकाण काय आहेत ?
मोरेश्वर – मोरेगाव, जिल्हा पुणे
चिंतामणी – थेऊर, जिल्हा पुणे
सिद्धिविनायक -सिद्धटेक, जिल्हा अहमदनगर
महागणपती- रांजणगाव, जिल्हा पुणे
विघ्नेश्वर-ओझर, जिल्हा पुणे
गिरीजात्मज- लेण्याद्री, जिल्हा पुणे
वरदविनायक- महड, रायगड जिल्हा
बल्लाळेश्वर- पाली, रायगड जिल्हा
माहिती आवडली असल्यास पुढे शेअर करा.