Mahashivratri 2024: महादेवाच्या भक्तांचा आवडता सण
Mahashivratri 2024: हिंदू धर्मातील भारतीयांचा प्रमुख सण म्हणजे महाशिवरात्री. पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिना वर्षाचा शेवटचा महिना असतो. यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च 2024 ला येत आहे.
हिंदू शास्त्रात महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करत महादेवाची उपासना करण्यास सांगण्यात आले आहे. असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवासाठी उपवास केल्याने व पूजा केल्याने ते अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
विवाहित व्यक्तींनी आपल्या जोडीदारासह महादेवाची पूजा केल्यास पूजा लवकर सफल होते आणि वैवाहिक जीवनात सुख शांती राहते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात महाशिवरात्री जोरात साजरी केली जाते. मध्य भारतात महाशिवरात्रीला पवित्र महाकालेश्वर मंदिर,उज्जैन येथे शिवभक्तांची प्रचंड गर्दी होत असते.
आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो महाशिवरात्रि का साजरी करतात? फाल्गुन महिन्यातील महाशिवरात्रि आणि दर महिन्याला येणारी शिवरात्री यामध्ये फरक काय? चला तर मग जाणून घेऊया महाशिवरात्री का साजरी करतात.
सामग्री सारणी
महाशिवरात्री का साजरी करतात ?
Mahashivratri 2024: महाशिवरात्री का साजरी केली जाते व महाशिवरात्रीशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत.
समुद्रमंथनाची कथा:
Mahashivratri 2024: समुद्रमंथनाच्या वेळी अमृताप्रमाणेच विषारी हलाहल देखील बाहेर निघाले होते. हलाहल विषामध्ये संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याची क्षमता होती. संपूर्ण सृष्टीला या विषारी हलाहल पासून वाचविण्यासाठी भगवान महादेवाने हे विष स्वतः प्राशन केले होते. हे विष इतके शक्तिशाली होते की भगवान शंकरांना प्रचंड वेदना झाल्या होत्या आणि त्यांचा गळा निळा झाला होता.
देवतांच्या वैद्यांनी त्यांना रात्रभर जागी राहण्याचा सल्ला दिला होता. म्हणूनच भगवान शंकराला जागी ठेवण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी सर्व देवतांनी नृत्य केली आणि संगीत वाजवले. पहाट झाल्यावर भगवान शंकरांनी सर्वांना आशीर्वाद दिले. अशाप्रकारे महादेवाने संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले आणि शिवरात्री हा या घटनेचा उत्सव आहे. तेव्हापासून या दिवशी भाविक उपवास करतात.
शिव आणि पार्वती विवाह:
Mahashivratri 2024: एका मान्यतेनुसार शिव आणि पार्वती यांचा विवाह प्राचीन काळी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या पत्नी पार्वतीची पूजा केली जाते.
शिव लिंगाची उत्पत्ती:
Mahashivratri 2024: प्राचीन दंतकथेनुसार एके दिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्मा आपापसात वाद घालत होते. दोन्ही देव स्वतःला आपले वरिष्ठ सांगत होते. त्या दोन्ही देवांमधला वाद खूप वाढल्यानंतर भगवान शिव स्वतः लिंगाच्या रूपात तेथे प्रकट झाले होते. ब्रह्मा आणि विष्णू या दोघांना शंकर भगवान म्हणाले होते की तुमच्यापैकी जो कोणी या लिंगाचा शेवट शोधून काढेल तो सर्वोत्तम असेल.
जेव्हा महादेव स्वतः लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले तेव्हा ती फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी होती. तेव्हापासून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्याची प्रथा आहे.
महादेवाच्या पूजेमद्धे केतकीचे फुल का वापरत नाहीत?
Mahashivratri 2024: भगवान शंकराचे ऐकून ब्रह्माजी एका टोकाकडे तर विष्णूजी दुसऱ्या टोकाकडे गेले. विष्णूंना लिंगाचा शेवट मिळाला नाही आणि ते माघारी परतले. ब्रह्मदेवाला देखील लिंगाचा शेवट मिळाला नव्हता पण स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी त्यांनी लिंगाचा अंत सापडला असे खोटे बोलण्यासाठी केतकीचे रोप सोबत घेतले.
ब्रह्मदेव विष्णू समोर आले आणि त्यांनी विष्णूंना सांगितले की त्यांना लिंगाचा शेवट सापडला आहे आणि तेव्हा केतकीच्या रोपानेही हे सत्य सांगितले.
हे सर्व पाहून भगवान शंकर प्रचंड चिडले आणि ते म्हणाले की ब्रह्मदेव खोटे बोलत आहेत. भगवान शंकरांनी ब्रह्मदेवांना खोटे बोलल्याबद्दल शाप दिला की आज पासून तुझी पूजा होणार नाही आणि माझ्या पूजेत केतकीचे फुल वापरले जाणार नाही.
पौराणिक कथेनुसार या दिवशी अग्निलिंगाच्या उदयाने सृष्टीची सुरुवात झाली होती.
हेही वाचा: गणेश जयंती आणी गणेश चतुर्थी मध्ये काय फरक आहे?
Mahashivratri 2024
पारधी व हरीण यांची कथा:
Mahashivratri 2024: पार्वती माता एकदा भगवान शंकरांना विचारते की सर्वोत्तम आणि साधे व्रत कोणते आहे ज्याद्वारे नश्वर जगातील प्राणी सहजपणे तुमचे आशीर्वाद प्राप्त करू शकतात? तेव्हा भगवान शंकराने पार्वती मातेला शिवरात्री व्रताचे नियम सांगितले आणि ही कथा सांगितली होती.
एक पारधी होता तो शिकार करून आपले कुटुंब चालवीत असे. त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शिकारीवर होत असे. एका रात्री शिकारीच्या शोधात पारधी गेला असताना आणि शिकार शोधत असताना तो एका झाडावर चढून बसला होता. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते.
आपल्याला शिकार नीट दिसावी म्हणून पारधी बेलाच्या झाडाचे पाने तोडून खाली फेकत होता. नकळत ती बेलाची पाने झाडाच्या खाली असलेल्या शिवलिंगावर पडत होती. पहाटे तेथे एक हरीण आले. पारधी हरिनाला बाण मारणार तेवढ्यात हरिण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो त्यानंतर मला मार. हरणाची वाट पाहता पाहता पारधी बेलाच्या झाडाचे पाने तोडून खाली फेकतच होता.
Mahashivratri 2024
थोड्यावेळाने हरणाचे संपूर्ण कुटुंब तेथे आले आणि सगळेच म्हणू लागले मला मार आणि इतरांना सोडून दे. हे पाहून पारधी आश्चर्यचकित झाला. त्याने संपूर्ण हरिनाच्या कुटुंबाला तेथून जाऊ दिले आणि त्यानंतर शिकार न करण्याचे ठरवले. या संपूर्ण घटनेदरम्यान पारधी उपाशी होता. त्याच्याकडून त्या रात्री नकळत उपवास घडला, महादेवाची पूजा आणि व्रत झाले. पारधी चे मन परिवर्तन झाले.
भगवान शंकर हे सगळे पाहून हरीण आणि पारधी दोघांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. हरिनाला मृग नक्षत्र म्हणून व पारधीला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या दिवशी घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता.
महाशिवरात्री आणि प्रत्येक महिन्यातील शिवरात्री दोघांमध्ये फरक काय आहे?
Mahashivratri 2024: प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या एक दिवसाआधी म्हणजेच कृष्ण पक्ष चतुर्दशीला शिवरात्री असे म्हटले जाते. परंतु फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्रि म्हणून ओळखले जाते.
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या रात्री चंद्र पूर्णपणे क्षीण असतो. अमावस्येच्या परिणामापासून वाचवण्यासाठी अमावस्येच्या एक रात्री आधी चतुर्दशी तिथीला शिवरात्री साजरी केली जाते.
Mahashivratri 2024
वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व:
वैज्ञानिक दृष्टीने पहायचं झालं तर महाशिवरात्रीच्या रात्री ग्रहांचा उत्तरी गोलार्ध याप्रकारे उपस्थित असतो की मनुष्याच्या आतील ऊर्जेला प्राकृतिक रूपात वरच्या दिशेने पाठवत असतो. याप्रकारे प्रकृती स्वतः मनुष्याला त्याच्या आध्यात्मिक शिखरापर्यंत जाण्यास मदत करते.
धार्मिक दृष्टीने बघितले तर प्रकृती महाशिवरात्रीच्या रात्री मनुष्याला परमात्म्यासोबत जोडण्याचे काम करत असते. महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करून ध्यानमुद्रामध्ये बसल्याने अधिक लाभ होत असतात.
Mahashivratri 2024
हेही वाचा: प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेले पशुपतिनाथ व्रत कसे करावे.
शिवालयात महादेवासमोर नंदीची मूर्ती का असते?
प्रत्येक शिवालयात महादेवांसमोर नंदीची मूर्ती असते. हिंदू धर्मामध्ये महादेवाच्या दर्शनाप्रमाणेच नंदीचे दर्शन व पूजा करणे आवश्यक आहे.
प्राचीन कथेनुसार शिलाद मुनी पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची आराधना करतात. शिलाद मुनी यांनी आजन्म ब्रह्मचर्याचे पालन केलेले होते. एके दिवशी त्यांना त्यांच्याच शेतात एक गोंडस बाळ सापडते आणि त्याचवेळी आकाशवाणी होते. बाळाचे संगोपन करण्यास शिलाद मुनींना सांगण्यात येते. शीलाद मुनी त्या बाळाचे नाव नंदी असे ठेवतात.
नंदी अभ्यासात आणि इतर विद्या शिकण्यात खूप तरबेज होता शिवाय तो अत्यंत आज्ञाधारी होता. परंतु नंदीचे आयुष्य हे कमी होते आणि त्यामुळे शिलाद मुनी अत्यंत दुःखी झाले. आपले आयुष्य वाढवण्यासाठी नंदिनी महादेवाची उपासना करण्यास सुरुवात केली.
Mahashivratri 2024
महादेव नंदीच्या उपासनेवर प्रसन्न होतात. महादेवांचे रूप पाहून नंदी भारावून जातो आणि त्याची काहीच न मागण्याची इच्छा होते. परंतु नियमानुसार त्याला काहीतरी मागावे लागणार होते म्हणून नंदी महादेवाला म्हणतो की मला तुमच्याजवळ कायमचं राहायचं आहे. हे एकूण महादेव नंदीला म्हणतात की माझ्याकडे असलेला बैल मरण पावलेला आहे तू त्याच्या जागेवर आजपासून राहशील, तू माझे वाहन बनशील आणि समस्त गणांचा मुख्य ही तूच राहशील तेव्हापासून नंदी बैलाच्या रूपात महादेवांच्या जवळ असतो.
भगवान महादेव अनेकदा ध्यानात मग्न असतात. महादेवाने नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. असे म्हणतात की, भगवान महादेव जेव्हा तपश्चर्या किंवा ध्यानात मग्न असायचे तेव्हा माता पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगत असे.
म्हणूनच शिवभक्त त्यांची इच्छा नंदीच्या कानात सांगत असतात. नंदीच्या कुठल्याही कानात आपली इच्छा शिवभक्त सांगू शकतात. पण असे म्हणतात की डाव्या कानात माणसाने सांगितलेली इच्छा महादेवांपर्यंत लवकर पोहोचते.
महादेवाचे काही प्रसिद्ध गीते:
प्रसिद्ध शिवमहापुराण कथा वाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथा मंडपात ऐकू येणारी धुन येथे ऐका.
निष्कर्ष:
हिंदू धर्मातील भारतीयांचा प्रमुख सण म्हणजे महाशिवरात्री. पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते.
Mahashivratri 2024 FAQ:
महादेवांचे दर्शन नंदीच्या बाजूनेच का घेतात?
असं म्हणतात की नंदीसमोर उभे राहिल्यावर महादेवांची ध्यानस्थ अवस्था तुटते. म्हणून नेहमी महादेवाचे दर्शन नंदीच्या बाजूने घ्यावे.
शंकराच्या गळ्यात नाग का असतो?
प्राचीन कथेनुसार महादेवाच्या गळ्यातील नाग हा नागलोकचा राजा वासुकी आहे. वासुकी राजा हा महादेवाचा परमभक्त होता. महादेवाने वासूकीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला नेहमी आपल्या गळ्यात अलंकार म्हणून घालण्याचे वरदान दिले होते.
शिवलिंगावर जलधारा, दूध, मध आणी बेलाचे पान का अर्पण केले जाते?
समुद्रमंथनाच्या वेळी महादेवाने हलाहल विष प्राशन केले होते. या विषामुळे महादेवांच्या शरीरातील उष्णता खूप वाढली होती आणी ही उष्णता शांत करण्यासाठी जलधारा अर्पण करण्यात आली होती. तसेच बेलपत्र, दूध, दही आणी मध या गोष्टींमुळे महादेवाला शितलता प्रदान होते असे मानले जाते.
महादेवाच्या हातात त्रिशूळ का असते?
त्रिशूल हे रज, तय आणि सर यांचे प्रतीक मानले जाते. हे दैवी आणि भौतिक विनाशाचे घटक देखील मानले जाते. महादेवाच्या त्रिशूलासमोर विश्वाची कोणतीही शक्ती अस्तित्वात राहू शकत नाही. ज्याप्रमाणे प्रत्येक देवाचे आवडते शस्त्र आहे त्याप्रमाणे महादेवाचे आवडते शस्त्र त्रिशूळ आहे.
महादेवाच्या कपाळावर चंद्र का असतो?
या मागे अनेक कथा आहेत. समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले हलाहल भगवान महादेवांनी प्राशन केले होते. भोलेनाथांना विषाच्या उष्णतेपासून मुक्ती मिळण्यासाठी सर्व देवांनी चंद्र देवाला प्रार्थना केली की त्यांनी भगवान शंकराच्या मस्तकावर बसावे जेणेकरून चंद्राच्या शितलतेच्या प्रभावाने विषाची उष्णता कमी होईल.
चंद्र हा शितलतेचा प्रतीक आहे. यातून असा संदेश मिळतो की मनाला डोक्याने नियंत्रित करा. मन नियंत्रित असेल तर ते इकडे तिकडे भटकत नाही. तसेच जीवनात कितीही संकट अडचणी आल्या तरी डोकं शांत ठेवावे.
Mahashivratri 2024
महादेव स्मशानात का राहतात?
संपूर्ण संसार हा मोहमायेचे प्रतीक असून स्मशान हे वैराग्याचे प्रतीक आहे. संसारात राहून आपले कर्तव्य पूर्ण करावेत परंतु मोहमाया पासून दूर राहावे.
भगवान शंकराच्या जटा मध्ये गंगा का असते?
भगीरथांच्या विनंती मुळे भगवान शंकरांनी गंगा मातेला पृथ्वीवर जाण्यास सांगितले होते. मात्र गंगा मातेच्या प्रवाहामुळे पृथ्वीवरील जीवन संपुष्टात आले असते म्हणून गंगा मातेचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी महादेवांनी गंगेला आपल्या जटांमधून वाहण्यास सांगितले.
शिवलिंगावर भस्म का लावतात?
भस्म म्हणजे राख. सृष्टी नष्ट झाल्यानंतर राखच शिल्लक राहणार आहे. सृष्टी नष्ट झाल्यानंतर सर्वांचा आत्मा महादेवात सामावला जाणार आहे. महादेवासाठी सर्व समान आहेत आणि शेवटी त्यांच्यामध्येच विलीन होणार आहेत. यामागे अनेक पौराणिक कथा देखील आहेत.
शंकराच्या हातात डमरू का असतो?
पौराणिक कथेनुसार विश्वाच्या निर्मितीच्या वेळेस सरस्वती माता अवतरली होती सरस्वती देवीच्या वाणीतून निर्माण होणारा आवाज हा स्वर आणि संगीत विरहित होता. म्हणून भगवान शंकराने 14 वेळा डमरू वाजवून तांडव नृत्य करून संगीत निर्माण केले. भगवान महादेवांना संगीताचे जनक देखील म्हटले जाते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढविण्यासाठी लोक डमरू घरात ठेवतात.
शंकराची आरती कोणती आहे?
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥
बारा ज्योतिर्लिंगांची नावे व त्यांचे स्थान कुठे आहे?
१.सोमनाथ (गुजरात – वेरावळ)
२.मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश – श्रीशैल्य)
३.महांकलेश्वर (मध्यप्रदेश – उज्जैन))
४.ओंकारेश्वर (मध्यप्रदेश – ओंकारेश्वर)
५.वैजनाथ (महाराष्ट्र – परळी)
६.भीमाशंकर (महाराष्ट्र – भीमाशंकर)
७.रामेश्वर (तामिळनाडु – रामेश्वर)
८.नागनाथ (महाराष्ट्र – औंढा नागनाथ)
९.विश्वेश्वर (उत्तर प्रदेश – वाराणसी)
१०.त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र – त्र्यंबकेश्वर)
११.घृष्णेश्वर (महाराष्ट्र – औरंगाबाद)
१२.केदारनाथ (उत्तरांचल – केदारनाथ)
बारा ज्योतिर्लिंगाचा श्लोक कोणता व त्याचे महत्त्व काय आहे?
सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशंच शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥
धार्मिक पुराणानुसार जी व्यक्ति वरील बारा ज्योर्तिलिंगाचे सकाळ व संध्याकाळ मनोभावे नामस्मरण करते त्या व्यक्तीचे सात जन्मातील त्याच्याकडून झालेले पाप ज्योर्तिलिंगाच्या स्मरणामुळे नष्ट होते.
मृत्युंजय मंत्र व त्याचे फायदे काय आहेत?
ॐ मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागतम जन्म मृत्यु जरा व्याधि पीड़ितं कर्म बंधनः||
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ‘
मृत्युंजय मंत्राने रोग, समस्या दूर होऊन अकाली मृत्यूची भीतीही नाहीशी होते. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य, पुनर्प्राप्ती, संपत्तीची प्राप्ती, प्रसिद्धी प्राप्ती आणि संतान प्राप्ती होते.
(टीप: वरील माहिती ही ज्योतिष शास्त्रावर आणि पुराणातील माहितीवर आधारित आहे.)
माहिती आवडली असल्यास पुढे नक्की शेअर करा.