Akshay Tritiya 2024 | अक्षय्य तृतीयेची मज्जाच न्यारी, खानदेशनी आखाजी लय भारी!

Akshay Tritiya 2024: साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीया हा सण यावर्षी दि. 10 मे 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. अक्षय्य तृतीयाप्रमाणेच या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती, परशुराम जयंती आणि बसवेश्वर जयंती देखील साजरी केली जाते. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. खानदेशातील दिवाळी म्हणून प्रसिद्ध असलेला आखाजी म्हणजेच अक्षय्य तृतीयेचा सण का व कसा साजरा केला जातो हे जाणून घेऊया.

Akshay Tritiya 2024: आखाजी (अक्षय्य तृतीया) सणाचे महत्त्व

Akshay Tritiya 2024: संपूर्ण भारतात हिंदू धर्मातील सण आणि उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जात असतात. जानेवारी महिन्यात असणारा मकर संक्रांतीचा सण, त्यानंतर होळी, गुढीपाडवा आणि श्रीराम नवमी असे एका मागून एक येणारे महत्त्वाचे सण यामुळे सर्व हिंदू धर्मियांमध्ये सण व उत्सव साजरा करण्याचा वेगळाच उत्साह असतो. प्रत्येक सणाचे महत्त्व व परंपरा जोपासत हे सण मोठ्या थाटामाटात आणि धुमधडाक्यात साजरे केले जातात. असाच एक सन की जो कडक उन्हाळ्यात येतो आणि बाल गोपालांपासून महिलावर्ग ह्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात तो म्हणजे आखाजी.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. साहजिकच शुभमुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीया सण प्रत्येक हिंदू धर्मियांसाठी  महत्त्वाचा असतो. हा एक असा दिवस असतो जिथे तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाळण्याची गरज नसते. या तिथीला केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही. तसेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ अक्षय्य असे मिळते, म्हणून तृतीयेला येणाऱ्या ह्या सणाला अक्षय्य तृतीया असे म्हणतात.

अक्षय्य म्हणजे जे कधीही संपत नाही. या शुभ दिवशी केलेले कार्य मनुष्याचे जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. भगवंत आणि पूर्वज यांना उद्देशून या शुभमुहूर्ताला जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय्य होते.

Akshay Tritiya 2024: अक्षय्य राहो तुमची संपत्ती!

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गंगेत स्नान करण्याची परंपरा आहे. असे म्हणतात की जो मनुष्य या दिवशी गंगेत स्नान करतो, तो मनुष्य पापातून मुक्त होतो. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले होते अशीही आख्यायिका प्रचलित आहे. भगीरथानी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर आणली होती.

असे देखील म्हणतात की, या शुभ दिनी भगवान विष्णूंनी श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता आणि म्हणूनच हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापर युगापर्यंत भगवान विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी राहिले होते. ब्राह्मण कुटुंबात जन्मात आलेले परशुराम हे सप्तर्षींपैकी एक आहेत.

Akshay Tritiya 2024

वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरन दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असते. नर नारायण या दोन देवतांनी या शुभ दिवशी अवतार घेतला होता असे देखील मानले जाते. भगवान श्रीकृष्णांनी युधीष्ठीराला असे सांगितले होते की, अक्षय्य तृतीया या शुभमुहूर्ताला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले जाते. अक्षय्य तृतीयेला कृतयुग संपून त्रेता युग सुरू झाले असे देखील मानले जाते. या दिवशी कृषी संस्कृतीचे पालक म्हणून बलरामांची पूजा केली जाते.

Akshay Tritiya 2024: अशी साजरी होते खानदेशात आखाजी

Akshay Tritiya 2024: कडक उन्हाळ्यात येणाऱ्या या सणाची खानदेशातील प्रत्येक व्यक्ती आतुरतेने वाट पाहत असते. आखाजीला खानदेशात दिवाळी इतकेच महत्त्व असते. विवाहित महिला आणि त्यांची मुले आखाजीच्या सुट्ट्यांची वाट पाहत असतात. शाळेला लागलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना आखाजीचा सुट्ट्या देखील म्हणतात. विवाहित महिला माहेरी जाण्यासाठी उत्सुक असतात तर मुले मामाच्या गावाला जायला उत्सुक असतात. मुलांना व मुलांच्या आईला माहेरच्या लोकांकडून या दिवशी नवीन कपडे देखील मिळत असतात.

Akshay Tritiya 2024: सासुरवाशिणीचा सण!

महिलांचे उन्हाळ्यातील घरकामे आटोपलेली असतात. पापड, कुरडया, शेवया, वडे, वेफर्स इत्यादी बनवून झालेले असतात. घरातील भांडी घासून झाल्यानंतर किचन एकदम चकचकात झालेले असते. चादरी, गोधड्या धुतल्यानंतर आतुरता असते ती आखाजीची. जसजशी आखाजी जवळ येत जाते तस तसे बाजारपेठांमध्ये आखाजीची चाहूल जाणवायला लागते. घागर (लाल मातीचे मडके), आंबे, खरबूज इत्यादी वस्तू बाजारात सर्वत्र दिसायला लागतात.

Akshay Tritiya 2024
Akshay Tritiya 2024

दिवाळीसाठी जसे लाडू, चकली, चिवडा, करंजी, इत्यादी फराळाचे पदार्थ बनवले जातात त्याचप्रमाणे खानदेशात घरोघरी सांजोरी आणि घुण्या बनवण्याची प्रथा आहे. काहींना साखर मिश्रित सांजोरी आवडते तर काहींना  गुळ मिश्रित सांजोरी खायला आवडते.मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्या की जळगांव, धुळे, नंदुरबार, मालेगाव आणि इतर खानदेशी पट्ट्यातील गावांना जाण्यासाठी बस आणि रेल्वे मध्ये गर्दी बघायला मिळते. पूर्वी नाशिक येथून पहाटे 5 वाजता सुटणारी देवळाली भुसावळ पॅसेंजर आखाजीच्या काळात महिला व बालगोपालांनी भरलेली दिसायची. त्याचप्रमाणे जळगांव, भुसावळ आणि धुळे बस स्थानकावर आजूबाजूच्या खेडेगावात जाण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी आखाजीच्या काळात होत असते.

Akshay Tritiya 2024: अक्षय राहो सुख तुमचे, अक्षय राहो धन तुमचे!

आखाजीचा दिवस पूर्वजांचे (पितरांचे) ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. ज्या घरात आखाजीच्या चालू वर्षी वडीलधाऱ्या व्यक्तीचे निधन झालेले असते त्या घरातील लोक डेरग भरतात. ज्या घरातील व्यक्तीचे निधन होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असेल त्या घरातील व्यक्ती घागर चे पूजन करतात. मातीची घागर पाण्याने भरून तिला लाकडी पाटावर टाकलेल्या गव्हावर ठेवले जाते. घागरीवर मातीच छोटसं बोळकं ठेवलं जातं. या बोळक्याला सुताचे पाच धागे बांधलेले असतात. मग त्यावर खरबूज, पुरणाची पोळी आणि आंबा ठेवून भगरीची पूजा केली जाते. यावेळी घराघरात गौराई देखील बसवली जाते. गौराईला आंघोळ घालण्यासाठी पाणी आणायला मुली आणि गावातील महिला एकत्र जमून डोक्यावर कळशी घेत नदीवर जातात.

Akshay Tritiya 2024
Image Credit: Instagram, lekhas_feast, Pune.

घरातील अंगण साफ करून, दाराबाहेर रांगोळी काढली जाते. पितरांचे स्मरण करून त्यांना जेवणासाठी आमंत्रण दिले जाते. दुपारचा स्वयंपाक झाल्यानंतर जेवणाआधी चुलीवर पितरांना घास टाकला जातो. देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर घरातील सर्वजण एकत्र जेवायला बसतात. आखाजी म्हंटली की जेवणाच्या ताटात आंब्याचा रस, पुरणपोळी, रशी, भात, कुरडई, पापड, भजी, इत्यादी पदार्थ हमखास दिसतात.

आखाजीच्या काळात शेतात किंवा घराबाहेर झोका बांधला जातो. झोक्याच्या दोन्ही पदरावर महिला बसून उंचच उंच झोके घेत गाणे म्हणत असतात. लहान मुलांचे झोका खेळण्यासाठी अक्षरशः भांडण होत असतात. पुरुष मंडळी मग त्यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण पत्त्यांचा डाव खेळत असतात. गल्लीबोळात, घराच्या ओट्यावर, कडूनिंबाच्या झाडाखाली, पारावर, जिथे जागा मिळेल तिथे मनसोक्त जुगार खेळत असतात. जरी जुगार खेळण्यावर बंदी असली, तरीही पुरुष मंडळी मुक्तपणे जुगार खेळतातच.

विवाहित महिलांप्रमाणेच शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी देखील आखाजीचा हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवशी शेतकरी शेतीची कामे बंद ठेवतात. शेतमजूर देखील सुट्टीचा आनंद लुटत असतात. अनेक लोक या दिवशी वावर देखील ठेवत असतात. म्हणजेच शेतकरी लोक आपली शेती दुसऱ्याकडे गहाण ठेवत असतात. सालदाराचा देखील वर्षाचा करार या दिवशी संपत असतो. शेतमजुरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. काही सालदारांना या दिवशी आपल्या मालकाकडून जेवणाचे आमंत्रण असते तर काही सालदारांना या दिवशी मालकाकडून नवीन कपडे देखील मिळत असतात.

यामुळेच खानदेशमधील आखाजीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले असते. आखाजी म्हणजे विसाव्याचा सण. सासरी असलेल्या कामाच्या व्यापातून माहेरी आल्यानंतर मिळालेल्या आरामाचा क्षण यनिमित्ताने महिला उपभोगत असतात.

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेची प्रथा, खरेदी व दान

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला नागरिक घराजवळील नदीत, गंगेत किंवा समुद्रात आंघोळ करतात. ब्राह्मणांना भोजन घालून त्यांना दक्षिणा दान दिले जाते. याच दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने, नवीन घर, नवीन वाहन इत्यादींची खरेदी केली जाते. सराफ बाजार गच्च भरलेला असतो.

या दिवशी वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. घरात समृद्धी आणि भरभराटी येते. या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण आंबे, मिठाई, नवीन कपडे, यांचे दान केले जाते.

Akshay Tritiya 2024: आखाजीचे प्रसिद्ध गीत

आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं.

कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं.

झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं, कसाना बाजार वं.

झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वं, बांगड्यास्ना बाजार वं.

माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो.

बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो.

आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं.

कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं.

झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं, कसाना बाजार वं.

झुयझुय पानी व्हाय तठे लच्छाना बाजार वं, लच्छाना बाजार वं.

माय माले लच्छाली ठेवजो ली ठेवजो.

बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो.

हेही वाचा: खरंच Dream 11 ने करोडपती होता येते का?

खापरावरील पुरणपोळी कशी बनवायची?विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सांजोरी कशी बनवायची?विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आखाजीला झोका कसा खेळतात?विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Akshay Tritiya 2024 FAQ:

1) हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्त कोणते?

गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा हे तीन पूर्ण मुहूर्त असून दिवाळीचा पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे.

2) हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे शुभ मुहूर्ताचे महत्त्व काय?

हिंदू पंचांगाप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याचा, नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात. हे मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभकाम सुरू करण्यासाठी दिनशुद्ध बघण्याची गरज नसते.

3) अक्षय्य तृतीयेला सोनं का खरेदी करतात?

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी केलेले सोनं किंवा दागिने हे अक्षय राहतात म्हणजेच नेहमी तुमच्या सोबत राहतात. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन स्थिर राहते.

असं म्हटले जाते की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्य सर्वाधिक तेजस्वी असतो म्हणूनच कदाचित सोन्याची तुलना सूर्यासोबत केली आहे. सोनं शक्ती आणि बलाचं प्रतीक आहे आणि या दिवशी सोनं खरेदी केल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी केल्यास घरात समृद्धी येते आणि आर्थिक संकट दूर होतात असा समज लोकांमध्ये आहे.

4) अक्षय्य तृतीयेचा अर्थ काय आहे?

अक्षय्य म्हणजे कधीही क्षय होत नाही. या दिवशी पूजा, दान, स्नान आणि शुभ कार्य केल्यास त्यांचे फळ चिरंतन राहते.

हेही वाचा: संकष्ट चतुर्थी का साजरी केली जाते?

Leave a comment