Board Examinations 2024: फेब्रुवारी महिना सुरू झाला की बहुतांश घरात परीक्षेचे वातावरण तयार झालेले असते. स्टेट बोर्ड असू द्या किंवा अन्य बोर्ड असू द्या, इंग्रजी माध्यम असू द्या किंवा मराठी माध्यम असू द्या, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या घरी बोर्डाची परीक्षा, बोर्डाची परीक्षा हे शब्द सतत कानावर येत असतात.
सामग्री सारणी
Board Examinations 2024
प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासात बोर्ड परीक्षा हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचे मूल्यांकन तर होतच असते परंतु भविष्यातील त्यांची कारकीर्द बोर्डाच्या परीक्षेवर अवलंबून असते. प्रत्येक विद्यार्थ्यांचे व पालकांचे काही स्वप्ने असतात, बोर्डाच्या परीक्षेतील गुणांवर अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होत असतात.
परंतु बऱ्याच वेळा असे होते की बोर्डाची परीक्षा जशी जशी जवळ येते तसे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांची चिंता देखील वाढत असते. अनेक वेळा पालक त्यांच्या अपेक्षेचे ओझे विद्यार्थ्यांवर टाकत असतात. विद्यार्थी देखील काही वेळेस गोंधळलेल्या अवस्थेत असतात. मग नेमकी बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांची की पालकांची?
Board Examinations 2024
विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन
बोर्डाची परीक्षा म्हटली की प्रत्येक विद्यार्थ्याचे एक विशिष्ट ध्येय ठरलेले असते आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी परीक्षेत जास्तीत जास्त गुण कसे मिळतील यासाठी विद्यार्थी अभ्यास करत असतात. परंतु बरेच विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेचे मनावर दडपण निर्माण करून घेतात. परीक्षेचा अभ्यास कसा करावा याविषयी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसते. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेची तयारी कशी करावी हे जाणून घेऊया.
१. सर्वप्रथम विषयानुसार संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्या. त्यानंतर प्रश्नपत्रिका व त्यांचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे.
२. प्रत्येक विषयाला योग्य न्याय देण्यासाठी वास्तववादी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. अभ्यासात सातत्य ठेवा आणि शक्य होईल तितके तुम्ही बनवलेल्या अभ्यासाच्या वेळापत्रकाचे पालन करा.
३. बोर्डाच्या परीक्षेची तयारी करताना पुनरावृत्ती आणि सरावाला प्राधान्य द्या. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून पहा. पुनरावृत्ती व सरावाने तुमचा आत्मविश्वास वाढेल.
४. एखादा प्रश्न किंवा विषय याबाबत मनात शंका ठेवू नका. तुमच्या शंका किंवा अडचणी बद्दल त्वरित शिक्षक किंवा समन्वयकांकडून मदत घ्या.
५. प्रत्येक विद्यार्थ्याची आत्मसात करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे अभ्यासाच्या पद्धती देखील वेगवेगळ्या असतात. दुसऱ्यांच्या अभ्यास पद्धतीचा अवलंब न करता तुमच्यासाठी उत्तम असलेली अभ्यास पद्धतीचा अवलंब करा.
६. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा.
Board Examinations 2024
७. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून ध्येय साध्य करण्यासाठी भरपूर मेहनत करा. परीक्षेदरम्यान अयोग्य पद्धतीचा अवलंब करू नका.
८. कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ देऊ नका. अभ्यासादरम्यान व्यायाम, योग्य झोप आणि संतुलित आहाराचा समावेश करा.
९. तणाव दूर करण्यासाठी काही प्रेरणादायक मराठी,हिंदी किंवा ज्या भाषेतील गाणे तुम्हाला आवडत असतील ती गाणे थोड्यावेळ ऐका.
१०. अभ्यासादरम्यान ज्या गोष्टी किंवा वाईट सवयी तुम्हाला विचलित करू शकतील अश्यापासून दूर राहा.
११. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.
पालकांसाठी मार्गदर्शन
प्रत्येक पालकांना असे वाटत असते की आपल्या पाल्याने बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवावे जेणेकरून त्याची भविष्यातील कारकीर्द व्यवस्थित राहील. बऱ्याच पालकांनी तर आधीच ठरवलेले असते की आपल्या पाल्याने बोर्डाच्या परीक्षेनंतर काय करावे. काही पालक त्यांच्या अपेक्षेचे ओझे त्यांच्या पाल्यांवर टाकायचा प्रयत्न करत असतात.
Board Examinations 2024
मी इंजिनियर किंवा डॉक्टर आहे तर माझा पाल्य देखील इंजिनीयर किंवा डॉक्टर झाला पाहिजे अशी मानसिकता बऱ्याच पालकांची असते. विद्यार्थ्यांची क्षमता न ओळखता त्यांच्यावर आपल्या अपेक्षेचे ओझे लादणे हे चुकीचे आहे. बोर्डाच्या परीक्षेची तयारी करताना आपला पाल्य तणाव मुक्त कसा राहील याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
१. पालक या नात्याने आपल्या पाल्याची भविष्याची आणि करिअरची चिंता असणे स्वाभाविक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यासाची क्षमता ही वेगवेगळी असते. माझ्या पाल्याने इतकेच मार्क मिळवले पाहिजे किंवा शेजारच्या मुलाला बोर्डाच्या परीक्षेत मिळालेल्या मार्कांपेक्षा जास्त मार्क मिळायला हवे, इत्यादि अशा अपेक्षा न बाळगता आपल्या पाल्याची क्षमता तपासा.
२. तुमच्या मुलांशी बोला, त्यांच्या समस्या समजून घ्या आणि एकत्रितपणे त्यांचे निराकरण करा.
३. आपल्या मुलाला अभ्यासाचे वेळापत्रक बनविण्यासाठी आणि त्याचे पालन करण्यासाठी मदत व योग्य मार्गदर्शन करा.
४. अभ्यासादरम्यान मुलांची झोप, त्यांचा आहार आणि आरोग्य याची काळजी घ्या.
५. आपल्या मुलांचा आत्मविश्वास सतत वाढवत रहा आणि त्यांना तणावमुक्त वातावरणात अभ्यास करू द्या.
Board Examinations 2024
६. आपली मुले जेव्हा अभ्यास करत असतील तेव्हा घरातील वातावरण देखील अभ्यासासाठी पोषक असणे महत्त्वाचे आहे. घरात नेहमी प्रसन्न वातावरण राहील याची काळजी घ्या. कुठलेही वाद शक्यतो टाळा.
७. मुलांचे अभ्यासापासून लक्ष विचलित करण्याची साधने जसे की टीव्ही, मोबाईल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, सोशल मीडिया, चॅटींग करण्याची साधने काही दिवस त्यांच्यापासून दूर करा. यासाठी मुलांना अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगताना त्यांना सांगा की काही दिवस या गोष्टींपासून दूर राहावे लागेल. दिवसातील काही वेळ त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधण्यासाठी त्यांना हवा उपलब्ध करून द्या.
८. घरातले वातावरण अगदीच तणावाचे न ठेवता अभ्यास व परीक्षेसाठी पोषक कसे ठेवता येईल याची पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पालकांनी देखील आपली मुले अभ्यास करत असताना जोर जोरात गप्पा मारणे टाळावे, टीव्ही पहात असल्यास टीव्हीचा आवाज कमी असावा आणि शक्य झाल्यास काही दिवस जी साधने मुलांच्या अभ्यासात व्यत्यय आणू शकतील अशा साधनांपासून दूर राहावे.
Board Examinations 2024
लक्षात असू द्या बोर्डाची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच पालकांसाठी देखील महत्त्वाची आहे. बोर्डाची परीक्षा ही जीवनातील अंतिम परीक्षा नसून पालकांनी देखील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
हेही वाचा: MHT CET आणि JEE या परीक्षांमध्ये काय फरक आहे?
Board Examinations 2024: परीक्षेनंतर अशी करा भविष्याची तयारी
तुमची आवड आणि उद्दिष्ट यांचा मेळ बसवा
बोर्डाच्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयाची निवड करताना तुमच्या आवडी आणि उद्दिष्टांचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला कसली आवड आहे, पुढील अभ्यास कसला करायचा आहे, महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे, उद्दिष्ट काय आहे, इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर पुढील शिक्षणासाठी तुम्ही महाविद्यालयाची निवड अगदी सहजपणे करू शकता.
पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयाची निवड अशी करा
दहावी, बारावी नंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी विविध महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. त्यामुळे उत्कृष्ट महाविद्यालय आणि विद्यापीठ निवडण्यासाठी संशोधन करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोणते शिक्षण घेण्यात आवड आहे हे कळल्यानंतर महाविद्यालय निवडणे अगदी सोपे जाते. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा कल हा कला, विज्ञान व वाणिज्य शिक्षणाकडे असतो. व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाची आवड असणारे विद्यार्थी आयटीआय व डिप्लोमा चा विचार करतात.
Board Examinations 2024
विविध महाविद्यालयांना भेट द्या
महाविद्यालयांची चौकशी फक्त ऑनलाईन न करता प्रत्यक्ष महाविद्यालयाला भेट द्या. महाविद्यालय तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे त्यावरून समजेल. महाविद्यालयात गेल्यानंतर वर्ग, प्रयोगशाळा, शिक्षणासाठी पोषक वातावरण आहे की नाही हे तपासा. कुठल्याही महाविद्यालयाचा कणा हा तेथील अनुभवी शिक्षक असतात. तुम्ही भेटलेल्या महाविद्यालयात अनुभवी शिक्षक व त्यांची पुरेशी संख्या आहे की नाही हे तपासा. असे निदर्शनात येते की बऱ्याच महाविद्यालयात फक्त कागदोपत्री अनुभवी शिक्षक असतात. प्रत्यक्षात शिक्षकांची कमतरता तेथे असते.
महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा कशी आहे हे देखील तपासा. शक्य असल्यास महाविद्यालयात शिकत असलेल्या विविध विद्यार्थ्यांशी संवाद करा. महाविद्यालयातील शिक्षण, सुविधा, इत्यादी प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा करा. महाविद्यालयात भेटल्यानंतर वार्षिक शैक्षणिक खर्च किती होऊ शकतो याचा अंदाज घ्या. महाविद्यालयात प्रवेश घेताना एकाहून अधिक महाविद्यालयांमध्ये अर्ज करा. तुमच्या आवडीच्या महाविद्यालयात तुम्हाला प्रवेश न मिळाल्यास इतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यात अडचण येणार नाही.
शैक्षणिक खर्चाबद्दल विचार करा
महाविद्यालयात प्रवेश घेण्याआधी शैक्षणिक खर्चाचा विचार करा. महाविद्यालयाची फी, शैक्षणिक साहित्य व इतर खर्चाचा विचार करा. खर्चाचा ताळमेळ बसवूनच महाविद्यालयाचा विचार करा. महाविद्यालयात फी मध्ये सवलत मिळते का, शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांना लाभ मिळतो का इत्यादी गोष्टींची चौकशी करा.
हेही वाचा: Gemini (Google Bard) आणी ChatGPT दोघांमध्ये फरक काय?
निष्कर्ष:
नक्कीच बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याला कलाटणी देणारी आहे. विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षेला सामोरे जावे. पालकांनी देखील अभ्यासाला पोषक असे वातावरण घरात’राहील याची काळजी घ्यावी.