Gudhi Padwa 2024: गुढीपाडवा का साजरा करतात?

Gudhi Padwa 2024: यावर्षी 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असून या दिवशी नवीन व्यवसाय प्रारंभ, नवीन वस्तू खरेदी करणे किंवा शुभकार्याची सुरुवात केली जाते. या शुभ दिवशी हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते.

Gudhi Padwa 2024: गुढीपाडवा साजरा करण्याचे कारण

भारतीय हिंदू संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. हिंदू नववर्षाचे आगमन होत असल्याने नवीन संकल्प केले जातात. परंतु गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात? गुढी का व कशी उभारली जाते? चला तर मग जाणून घेऊया या मागील पौराणिक कथा.

Gudhi Padwa 2024

Gudhi Padwa 2024: शालिवाहन शकास सुरुवात

शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडले व त्याला सजीव केले आणि त्याच्या मदतीने प्रभावी शत्रूंचा पराभव केला. या विजयानिमित्त शालिवाहन शक सुरू झाला असे म्हणतात.

शालिवाहनाच्या काळात लोक अक्षरशः थकलेले, चैतन्यहीन व पराक्रमहीन बनलेले होते आणि त्यामुळेच ते शत्रूंना जिंकू शकत नव्हते. शालिवाहनने येऊन या लोकांमध्ये चैतन्य निर्माण केले. दगडांच्या पुतळ्यात पौरुष व पराक्रम जागृत झाला आणि शत्रूंचा पराभव झाला.
शालिवाहन राजाने शालिवाहन शाखाची सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय.

Gudhi Padwa 2024: वालीवर विजय

रामायण काळात दक्षिण भारतात वानर राजा वालीची राजवट होती. वालीच्या जुलमी राजवटीमुळे लोकं त्रस्त झालेले होते. सीता मातेचा शोध घेत असताना प्रभू श्रीरामचंद्रांची भेट सुग्रीव सोबत झाली होती. सुग्रीवांनी प्रभू श्रीरामचंद्रांना वालीच्या अत्याचाराची माहिती दिली होती.

असे म्हणतात की चैत्र प्रतिपदेच्या दिवशीच प्रभू श्रीरामचंद्रांनी वालीच्या जुलमातून दक्षिणेकडील प्रजेची सोडवणूक केली होती. वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या  लोकांनी घरोघरी उत्सव साजरा केला. गुढ्या उभारल्या.

Gudhi Padwa 2024: ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली

असे म्हटले जाते की ब्रह्मदेवाने ज्या दिवशी सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस होता. ब्रह्मदेवाने पाडव्याच्या दिवशीच विश्व निर्मिती केली होती आणि पुढे सत्य युगाची सुरुवात झाली होती. म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.

Gudhi Padwa 2024: भगवान विष्णूंनी शंखासुराचा वध केला

शंखासुर नावाचा सागरातच वास्तव्य करणारा भयानक राक्षस होता. या शंखासुर राक्षसाने जबरदस्तीने वेद हरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला होता. सर्व देवतांनी ऋषीमुनींनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली आणि शंखासुरास धडा शिकविण्याकरता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून समुद्रातील शंखासुराचा शोध घेतला.

शंखासुर सापडला आणि त्याचा शिरच्छेद भगवान विष्णू करणार तितक्यात शंखासुर म्हणाला की हे भगवंता आपल्या हातून मला मरण यावे याकरताच मी वेद पळविले होते. आपण माझा वध करावा परंतु माझी एक इच्छा आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हणत शंखासुराचा वध केला आणि त्या दिवसापासूनच भगवान विष्णूंनी हातात शंख धारण केले आहे.

भगवान विष्णूंनी शंखासुराचा वध करण्याकरिता मत्स्यरूप धारण केले तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच होता.

हेही वाचा: होळी का साजरी केली जाते?

Gudhi Padwa 2024: भगवान शंकर आणि पार्वतीमाता यांचा विवाह

भगवान शंकर आणि पार्वती माता यांचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले होते. लग्नाच्या तयारीला पाडव्यापासून सुरुवात होऊन तृतीयेला विवाह संपन्न झाला होता. पाडव्याच्या दिवशी पार्वती मातेच्या शक्ती रूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र असे देखील म्हणतात. पार्वती मातेचे लग्न झाले की माहेरवाशीनी म्हणून पार्वती माता महिनाभर माहेरी जाते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते. या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते.

Gudhi Padwa 2024: गुढी का उभारली जाते?

चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा असे म्हणतात. गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी उत्सव साजरा करून गुढी उभारली जाते. आपण जी गुढी उभारतो ती विजयाचा संदेश देणारी आहे. घरातील असुरी संपत्तीचा(वालीचा) दैवी संपत्ती ने केलेला नाश हे गुढी सुचवत असते.

Gudhi Padwa 2024

गुढी म्हणजे विजय पताका. भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारांवर विचारांचा विजय. गुढीचे दर्शन प्रत्येक मानवाला आश्वासन देते की तू सुद्धा असत्याकडून सत्याकडे जाऊ शकतोस, दुर्गुणांकडून सद्गुणांकडे जाऊ शकतोस. मानवात आत्मविश्वास व नवचैतन्य निर्माण करण्याचे प्रतीक म्हणजे गुढी.

गुढीला ब्रम्हध्वज आणि विजयध्वज देखील म्हणतात. पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षांचा वनवास भोगून आणि लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले होते. तेव्हा संपूर्ण प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून  केले होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येला परतले म्हणून हा दिवस आनंदोत्सवाचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.

गुढीपाडवा साजरा करण्यामागे आणि उभारण्यामागे अनेक पौराणिक कथा असल्या तरी हा दिवस आनंदाचा, आसुरी व वाईट शक्तीवर विजयाचा, नवसंकल्पाचा आहे.

Gudhi Padwa 2024: गुढीपाडवा कसा साजरा करावा आणि गुढी कशी उभारावी?

गुढीपाडव्याशी फक्त सांस्कृतिक, धार्मिक गोष्टी जोडलेल्या नाहीत तर त्यात निसर्गाचा, पर्यावरणाचा देखील विचार आहे. नवीन वर्ष साजरे करताना प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस असल्याने गुढीपाडव्याला हिंदू सणांमध्ये प्रचंड महत्त्व आहे. या दिवशी म्हणजेच चैत्रशुद्ध प्रतिपदेला पहाटे लवकर उठावे आणि अभंग्य स्नान करून घरातील व अंगणातील साफसफाई करावी. घराबाहेर रांगोळी काढावी.

Gudhi Padwa 2024

घरातील मुख्य दरवाजाला तोरण बांधावे. एक लांब वेळूची म्हणजेच बांबूची काठी घेऊन तिला स्वच्छ धुवून तिच्या एका एका टोकाला कडुलिंबाची डहाळी, रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळली जाते. फुलांचा हार आणि साखरेची माळ लावल्यानंतर त्यावर तांब्या बसवला जातो. हळदीकुंकू, गंध, फुले अक्षता वाहतात आणि उदबत्ती दिवा लावून गुढीचे पूजन केले जाते. विजयाचे प्रतीक असलेली गुढी खिडकीत अथवा गच्चीवर उंच ठिकाणी लावली जाते.

कडुलिंबाची पाने व साखर यांचा प्रसाद सर्वांना वाटून दुपारी गुढीला गोड पदार्थांचा म्हणजेच पुरणपोळी किंवा श्रीखंड, पेढे इत्यादी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी पुन्हा गुढीची पूजा करून गुढीला उतरवण्याची प्रथा आहे.

सूर्योदयानंतर पाच ते दहा मिनिटात गुढी उभारणे शुभ मानले जाते तसेच सूर्यास्ताआधी गुढी उतरवणे गरजेचे देखील आहे. गुढी ही मांगल्याचे, स्नेहाचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते.

हेही वाचा: महाशिवरात्री का साजरी करतात?

Gudhi Padwa 2024: गुढीला कडुलिंबाची डहाळी का बांधतात?

चैत्र महिन्यापासून वसंत ऋतुच्या आगमनाला सुरुवात झालेली असते. वातावरणात अनेक बदल झालेले असतात. झाडांची जुनी सुकलेली पाने गळून नवीन पालवी फुटलेली असते, आंब्याला मोहर आलेला असतो. वातावरणातील वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात.

पूर्वीपासून गुढीपाडव्याला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुलिंबाच्या पानांसोबत वाटून खातात. कडुलिंबाच्या पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्यानाही कडूलिंब व साखर मिश्रित प्रसाद मिळतो.

कडुलिंबाचे सेवन करणारा व्यक्ती सदा निरोगी राहत असतो. जीवनात कधीही सुख किंवा दुःख एकटे येत नाही सुखाच्या मागेच दुःख असते आणि दुःखामागूनच सुखाचे आगमन होत असते. आयुष्यात प्रगतीपथावर जाणाऱ्याला जीवनामध्ये काही वेळा कडू घोट देखील प्यावे लागतात हेच कडुलिंब व साखरेचा प्रसाद सुचवत असतात.

Gudhi Padwa 2024: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्त

गुढीपाडवा हा सण दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी साजरा केला जाणार आहे.

Gudhi Padwa 2024: गुढीपाडवा शुभेच्छा संदेश

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

नक्षीदार काठीवर रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारूनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीखंड पुरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, नववर्ष जावो छान, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

गुढी प्रेमाची उभारूया मनी, औचित्य शुभ मुहूर्ताचे करूनी, विसरूनी जाऊ दुःख सारे, स्वागत करूया नववर्षाचे प्रेमभरे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, हिंदू संस्कृतीचा, सन उत्साहाचा, मराठी मनाचा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच खरी सुरुवात, हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा.

उंच आकाशात घेऊन भरारी, गुढी उभी राहिली प्रत्येक दारी, सुशोभित अंगणी आज दौडत आली नववर्षाची स्वारी. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

गुढीपाडवा गीत
गुढीपाडवा रांगोळी

निष्कर्ष:

चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा असे म्हणतात. गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी उत्सव साजरा करून गुढी उभारली जाते. आपण जी गुढी उभारतो ती विजयाचा संदेश देणारी आहे. घरातील असुरी संपत्तीचा(वालीचा) दैवी संपत्ती ने केलेला नाश हे गुढी सुचवत असते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

1. गुढीपाडवा किती तारखेला आहे?

यावर्षी 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे.

2. गुढीपाडवा कधी साजरा केला जातो?

गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो.

हेही वाचा: संकष्ट चतुर्थी का साजरी केली जाते?

माहिती आवडल्यास पुढे शेअर करा.

Leave a comment