Maharashtra Din 2024: महाराष्ट्र म्हंटले की संत तुकाराम, श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा, शंकर महाराज अशा अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणी भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म याच महाराष्ट्राच्या भूमीत झाला होता. अनेक धार्मिक स्थळे, शक्तीपीठे, पवित्र नद्या, ऐतिहासिक वास्तू, विशाल समुद्रकिनारा अशा अनेक नैसर्गिक व ऐतिहासिक गोष्टींनी संपन्न असलेला आपला महाराष्ट्र. याच महाराष्ट्रात अनेक स्वातंत्र्यवीरांचा, भारतरत्नांचा, खेळाडूंचा, उद्योगपतींचा जन्म झाला.
महाराष्ट्र दिनाची संपूर्ण माहिती
साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय, तंत्रज्ञान आणी क्रीडाक्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारे महाराष्ट्र राज्य आणि या राज्यातील सर्व नागरिकांना आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. ‘मंगल देशा पवित्र देशा…प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा’ असं म्हणत दरवर्षी 1 मे या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो. परंतु आज देखील अनेक लोकांना महाराष्ट्र राज्य स्थापनेचा संपूर्ण इतिहास माहित नसतो. जसे भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक वर्ष ब्रिटिश राजवटी विरोधात विविध क्षेत्रातून स्वातंत्र्य लढा उभा राहिला होता, हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण या भारत देशासाठी त्यागले होते त्याच प्रकारे महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यासाठी शेकडो हुतात्म्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले होते. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य स्थापनेचा रक्तरंजित इतिहास.

Maharashtra Din 2024: १ मे महाराष्ट्र दिन
ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा लाभलेला समृद्ध महाराष्ट्र. यावर्षी दिनांक 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचा 64 वा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी दिली जाते. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करण्यात येते. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती मंगल कलश देऊन नवीन महाराष्ट्र राज्याची जबाबदारी सोपवली. संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून श्री यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली. शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रित्यर्थ संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.
Maharashtra Din 2024: अशी झाली महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती
Maharashtra Din 2024: राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा आखल्या गेल्या. त्यावेळी मुंबई राज्य हे मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मिळून बनलेले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबई राज्याचे दोन भागात विभाजन करण्यासाठी चळवळ सुरू केली होती. एक भाग जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरा भाग जिथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात. 25 एप्रिल 1960 रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 नुसार या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती झाली. सदर कायदा 1 मे 1960 रोजी अंमलात आलेला होता.
Maharashtra Din 2024: हुतात्म्यांच्या बलिदानाचा रक्तरंजित इतिहास
Maharashtra Din 2024: राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारलेले होते आणि त्यामुळे मराठी माणसे अत्यंत संतापलेली होती. सरकारचा निषेध करण्यासाठी विशाल मोर्चा फ्लोरा फाउंटन समोरील चौकात नेण्याचे नियोजन करण्यात आलेले होते. फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून मोठमोठ्याने घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे जमला.

मोर्चाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. लाठीचार चा कुठलाही परिणाम आंदोलनकर्त्यांवर झालेला नव्हता. मुंबई राज्याची तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळीबार करण्याचा आदेश जारी केला. पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शेकडो हुतात्म्यांनी आपले प्राण गमावले. शेवटी या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने 1 मे 1960 रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली आणि गोळीबार झालेल्या ठिकाणी 1965 मध्ये हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
Maharashtra Din 2024: अशी सुरू झाली संयुक्त महाराष्ट्र चळवळ
भारतात बराच काळ ब्रिटिशांनी राज्यकारभार चालवलेला होता. राज्यकारभार सुरळीत होण्यासाठी ब्रिटिशांनी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केलेली होती. परंतु प्रांतांची विभागणी भाषेप्रमाणे नव्हती. 1920 मध्ये नागपूरला झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता. लोकमान्य टिळक हे देखील भाषावार प्रांतरचनेच्या बाजूने होते. मुंबईतील अमहाराष्ट्रीय भांडवलदारांना मुंबई महाराष्ट्राला द्यायची नव्हती. नेहरूंना भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा संकुचित व राष्ट्रीय एकात्मतेला धोका असं वाटत होता.
1946 मध्ये झालेल्या माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यिकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी देखील पाठिंबा दिला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा दर्शविण्याकरता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक घटक पक्ष होता. 28 नोव्हेंबर 1949 रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर डी. भंडारे यांनी मांडला.
Maharashtra Din 2024: जय जय महाराष्ट्र माझा
1948 रोजी प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावार प्रांतरचनेला विरोध दर्शविण्यात आलेला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी करण्यात आलेली होती. मुंबई ही अनेक भाषांच्या, वर्णाच्या लोकांचे, उद्योगधंद्यांचे शहर आहे असे अहवालात म्हटले गेले होते.
1953 रोजी फाजलअली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती करण्यात आली. या आयोगाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळलेला होता. नेहरूंनी त्यामुळे सौराष्ट्र सह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली. या त्रिराज्य योजनेत महाराष्ट्र पासून मुंबई तोडण्याचा डाव असल्याची भावना मराठी माणसांमध्ये पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनले. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर एस. एम. जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे या चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरलेले होते.

20 नोव्हेंबर 1955 रोजी मोरारजी देसाई व स. का. पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सहभाग घेऊन अत्यंत प्रक्षोभक विधाने केली. 21 नोव्हेंबर 1955 रोजी झालेल्या आंदोलनाच्या वेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे 15 जणांना प्राण गमवावा लागला होता. 1956 मध्ये केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर अनेक लोक रस्त्यावर उतरले. सत्याग्रह, आंदोलने, मोर्चे, हरताळ सर्वत्र सुरू झाले. मोरारजी सरकारने सत्तेचा दुरुपयोग करत निष्ठुरपणे शेकडो लोकांना गोळीबारात मारले. शेकडो जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

1 नोव्हेंबर 1956 ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव, कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतु या द्विभाषिकाला महाराष्ट्र व गुजरात येथे प्रचंड विरोध झाला. 1962 ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गांधींनी नेहरूंचे मन वळवले. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला परंतु त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. नेहरूंना राज्याला हवे असलेले मुंबई नाव वगळून समितीने महाराष्ट्र असे नाव ठरवले. 1960 सालच्या कामगार दिन म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते दिल्लीहून आणला गेला. नव्या महाराष्ट्र राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर ही उपराजधानी निश्चित करण्यात आली.
हेही वाचा: 10वी नंतर पुढे काय? पॉलिटेक्निक एक उत्तम पर्याय!
Maharashtra Din 2024: महाराष्ट्राविषयी थोडक्यात
भारताच्या पश्चिम भागातले एक समृद्ध असे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंखेच्या दृष्टीने दुसरे मोठे राज्य आहे.
राजधानी | मुंबई |
उपराजधानी | नागपूर |
नियामक मंडळ | महाराष्ट्र विधानमंडळ |
कार्यकारी मंडळ | महाराष्ट्र विधानसभा |
अधिकृत भाषा | मराठी भाषा |
स्थापना | 1 मे 1960 |
सर्वोच्च बिंदू | कळसुबाई शिखर |
लोकसंख्या | 11 कोटीपेक्षा अधिक |
क्षेत्र | 307713 चौ. किमी |
जिल्हे | 36 |
महसुली विभाग | पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, कोकण, नागपूर व अमरावती |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
Maharashtra Din 2024 FAQ:
1) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 साली झाली.
2) महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण होते.
3) महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा व शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
माहिती आवडली असल्यास पुढे नक्की शेअर करा.