Makar Sankrant 2024 : सुर्यदेव जेव्हा धनु राशि मधून निघून मकर राशी मध्ये प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. यावर्षी आपण मकर संक्रांतीचा सण १५ जानेवारी २०२४ रोजी साजरा करणार आहोत. दरवर्षी मकर संक्रांति हा सण १४ जानेवारी रोजी साजरी करतात, परंतु यावर्षी लीप ईयर असल्याने १५ जानेवारी रोजी आपण संक्रांती साजरी करणार आहोत.
महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांत साजरी केली जाते. संक्रांतीचा आधला दिवस भोगी, त्यानंतर संक्रात आणि किंक्रांत.
मकरसंक्रांती
मकर संक्रांतीची माहिती:
सूर्यदेव जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हटले जाते. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौर मास म्हणून ओळखला जातो.
पौष महिन्यापासून सूर्यदेव उत्तरायण होऊन मकर राशि प्रवेश करतात. संपूर्ण भारतातील विविध प्रांतात मकर संक्रांत हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. असे म्हणतात की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. सूर्यदेव या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतात यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते.
मकर संक्रांतीची पौराणिक कथा :
सूर्यदेव व शनिदेव यांची कथा :
देवीपुराणात असे सांगितले आहे की सूर्यदेव व त्यांचा पुत्र शनिदेव ह्या दोघांमध्ये वैर होते. शनिदेव व त्यांची आई यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला होता. यमराज आपल्या वडिलांना म्हणजेच सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पछाडलेले बघून दुःखी झाले. यमराजाने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली.
सूर्य देवाने रागात येऊन शनि देवाच्या घरी असलेली कुंभ राशी जाळून टाकली. त्यामुळे शनी देव व त्यांची आई दोघांना हाल अपेष्टा सहन करावी लागली. यमराजाने आपली सावत्र आई आणि भाऊ शनिदेवाला त्रासात पाहून त्यांच्या वडिलांना म्हणजे सूर्य देवाला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्य देवाने सांगितले की शनि देव जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येईल तेव्हा शनी देवाचे घर धन धान्याने भरून निघेल .
त्यामुळे शनिदेव खूप प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की मकर संक्रांतीला जे कोणी सूर्य देवाची पूजा करतील त्यांना शनि दशेचा त्रास सहन करावा लागणार नाही.सूर्यदेव जेव्हा आपला मुलगा शनि देवाला पहिल्यांदा भेटायला गेले होते शनि देवाने त्यांना काळे तीळ अर्पण केले होते आणि त्याद्वारेच त्यांची पूजा केली होती. सूर्यदेव या पूजेने खूप प्रसन्न झाले होते.
भीष्म पितामह यांची कथा :
महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देह त्याग करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवस निवडला होता.
म्हणून असे म्हणतात जी व्यक्ती उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करते त्याला मुक्ती मिळते. मकर संक्रांती पासून सूर्य देव उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोक आनंद उत्साहात साजरा करतात. असे देखील म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल याचे दान केल्यास मोक्षप्राप्ती होते.
मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण :
या दिवसापासून सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते. वातावरणातील गारव्याने हैराण झालेल्या लोकांना सूर्य देवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत मिळते. भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतातील अनेक सण,उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून असते.
मकर संक्रांतीच्या काळात शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी ह्या सणाचे स्वागत केले जाते.
भोगी म्हणजे काय?
संक्रांतीच्या आदीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात.ह्या दिवशी सकाळी घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला जातो.सासरच्या मुली ह्या दिवशी माहेरी येतात. भोगी हा आनंदाचा आणी उपभोगाचा सण मानला जातो त्यामुळे ह्या दिवशी तिळीच्या भाकरी,पापड, वांग्याचे भरीत, खिचडी असा देवाला नैवद्य दिला जातो.
तसेच ह्या दिवशी घेवडा, पापडी, हिरवे हरभरे, लाल गाजर, भुईमुंगाच्या शेंगा यांची भेसळ भाजी बनवितात व तिलाच भोगीची भाजी असे म्हणतात.
किंक्रांत म्हणजे काय?
संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात. ह्या दिवशी देवीने किंकसुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले होते आणी त्याच्या त्रासातून प्रजेला मुक्त केले होते. हा दिवस अशुभ देखील मानला जातो तसेच याला करिदिन देखील म्हणतात.
बोरन्हाण म्हणजे काय?
संक्रांतीच्या काळात लहान मुलांना काळया रंगाचे कपडे घालणे व हलव्याचे दागिणे घालण्याची प्रथा आहे. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओततात. सध्या ह्यामध्ये गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट टाकतात. ह्यालाच बोरन्हाण किंवा लुट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाच वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.
मकर संक्रांतीला तिळगुळ का वाटतात?
पौराणिक कारण :
ज्योतिष शास्त्रामध्ये काळे तीळ यांचा संबंध शनिदेव यांच्याशी जोडला गेलेला आहे तर गुळाचा संबंध हा सूर्यदेव यांच्याशी जोडला गेलेला आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव हे शनिदेव यांच्या घरी मकर राशि मध्ये प्रवेश करतात. या दिवशी जी व्यक्ती काळे तीळ व गूळ यांचे सेवन करते किंवा देवाणघेवाण करते अश्या व्यक्तींवर शनि देव व सूर्यदेव यांची कृपादृष्टी पडते.
वैज्ञानिक कारण:
संक्रांत हा सण ज्यावेळी येतो त्यावेळी वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला दिसतो तसेच वातावरणात थंडीचे प्रमाण खुप असते. गुळ व तीळ हे दोन्ही पदार्थ उष्णता युक्त असतात. तीळ व गुळाचे सेवन केल्याने शरीरामध्ये उष्णता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणी थंडी पासुन वाचण्यासाठी मदत होते.
मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात?
ह्या दिवशी सूर्य देवाचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होत असते म्हणून ह्या दिवशी रात्र देखील मोठी असते. काळोख्यातील मोठया रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून निरोप देण्याची प्रथा आहे.
वैज्ञानिक दृष्ट्या काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणूनच थंडीच्या दिवसात शरीर ऊबदार राहण्यासाठी मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात.
हेही वाचा: पशुपतिनाथ व्रताचा महिमा अपार
Makar Sankrant 2024: मकर संक्रांतीला पतंग का उडवतात?
किलबिल परिवारापासून ते अगदी तरुण मंडळी पर्यंत सर्व जण पतंग उडविण्यासाठी संक्रांतीची वाट पाहत असतात. ह्या दिवशी काही हौशी लोक अगदी ढोल ताशे, डीजे यांचे आयोजन करतात. आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग दिसत असतात. परंतु पतंग मकरसंक्रांतीलाच का जास्त उडवतात? ह्या मागे पौराणिक तसेच वैज्ञानिक कारण देखील आहे.
पौराणिक कथा :
असे म्हणतात की प्रभु श्रीराम ह्यांनी मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची सुरवात केली होती आणी त्यांनी उडवलेला पतंग हा स्वर्गात गेला होता व स्वर्गात इंद्र देवांचा मुलगा जयंत ह्यच्या पत्नीस पतंग सापडला. जयंतच्या पत्नीस पतंग खुप आवडतो आणी तो पतंग ती त्याच्याकडेच ठेवते. प्रभु श्रीराम हनुमंताला पतंग आणण्यासाठी पाठवितात परंतु जयंतची पत्नी असे म्हणते की श्रीराम यांचे दर्शन झाल्याशिवाय पतंग मिळणार नाही.
हनुमानजी सर्व प्रसंग श्रीराम यांना सांगतात आणी त्यावर श्रीराम असे म्हणतात की तीला सांग की ती मला चित्रकुट मध्ये पाहु शकते. हनुमानजी श्रीरामांचा आदेश जयंतच्या पत्नीस स्वर्गात जाऊन सांगतात व त्यानंतर त्यांना पतंग पुन्हा मिळतो.
वैज्ञानिक कारण :
पतंग उडविल्याने हात व पाय यांचा व्यायाम होतो आणी शरीराला ऊर्जा मिळते. संक्रांत हा सण थंडीत असल्यामुळे सूर्यप्रकाशात राहिल्यास व्हिटॅमिन डी देखील मिळते.
पतंग उडविताना योग्य ती सावधगिरी बाळगावी व नायलॉन मांजाचा वापर करू नये.
मकर संक्रांतीला हळदी कुंकू कार्यक्रम का करतात?
ह्या दिवशी सुर्य देव मकर राशीत प्रवेश करत असतात आणी असे म्हणतात की वातावरणात निर्माण होणाऱ्या लहरी साधना करण्यासाठी उत्तम असतात.म्हणून महिला एकत्र येतात व एकमेकींना हळद कुंकू लावून समोरील सुवासिनीच्या रूपातील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीतात.
म्हणूनच महिला एकमेकींना घरी बोलावून हळदी कुंकू लावतात व वाण म्हणजे भेट वस्तु देतात. पौराणिक दृष्ट्या वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील दैवी शक्तीला तन, मन आणी धन यांच्या त्यागातून शरण येणे होय.
हळदी कुंकू चा कार्यक्रम हा मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंत करतात कारण की रथसप्तमी पर्यंतचा काळ हा तेजाला प्रोत्साहन देणारा असतो.
निष्कर्ष:
हिंदू धर्मात मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सूर्य देव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात आणि हा संक्रमनाचा काळ मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो.
FAQ:
१.मकर संक्रांत का साजरी करतात?
सुर्यदेव जेव्हा धनु राशि मधून निघून मकर राशी मध्ये प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो.
२.मकर संक्रांत हा सण कोणत्या ऋतुत येतो?
हेमंत ऋतु.
तुम्हाला वरील माहिती आवडली असल्यास शेअर करा.