संपूर्ण जगभरात दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस 'एप्रिल फुल डे' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोकं एकमेकांना मूर्ख बनवतात, चेष्टा मस्करी करतात.
हा दिवस लोकं मित्रमंडळी, नातेवाईक ऑफिसमध्ये हसत खेळत साजरा करतात. विशेष म्हणजे या दिवशी एकमेकांना मूर्ख बनवताना केलेल्या चेष्टा-मस्करीचा राग येत नाही.
प्रत्येक व्यक्तीला कोणी ना कोणी एकदा तरी एप्रिल फुल केले असेल. परंतु तुम्हाला या दिवसाची सुरुवात कशी झाली हे माहित आहे का? यामागे काही मजेशीर ऐतिहासिक गोष्टी आहेत.
एप्रिल फुल डे साजरा करण्याची सुरुवात 1381 मध्ये झाली असेही म्हणतात. तत्कालीन इंग्लंडचा राजा रिचर्ड आणि बोहेमियाची राणी ऍनी यांच्या साखरपुड्याची मजेशीर गोष्ट देखील प्रचलित आहे.
रिचर्ड आणि ऍनी यांनी साखरपुड्याची तारीख 32 मार्च रोजी जाहीर केली होती आणि तेथील लोकांनी ते खरे देखील मानले होते. तेव्हापासून 32 मार्च म्हणजेच 1 एप्रिल हा दिवस फुल डे म्हणून साजरा केला जातो.
एप्रिल फुलची युरोपमधील गोष्ट देखील प्रसिद्ध आहे. प्राचीन युरोपमध्ये दरवर्षी 1 एप्रिल रोजी नवीन वर्ष साजरे केले जात होते. 1582मध्ये पोप ग्रेगरी यांनी 1 जानेवारीपासून नवीन वर्ष साजरे करण्यास सांगितले.
रोम मधील बहुतेक लोकांनी हे नवीन कॅलेंडर स्वीकारले. परंतु तरीही बऱ्याच लोकांनी 1 एप्रिलला नवीन वर्ष साजरे करण्यास सुरुवात केली आणि त्या लोकांना एप्रिल फुल म्हंटले गेले.