गणपती बाप्पा म्हणजे विद्या आणि बुद्धीची देवता, 14 विद्या आणि 64 कलांचा स्वामी, संपूर्ण गणांचा अधिपती. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात गणपती बाप्पाचे नामस्मरण करून केले जाते.

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिक मास आल्यास 13 संकष्ट चतुर्थी येतात.

जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाला प्रसूतीजन्य(गर्भज), बाल्यावस्था(देहज), मरणात्मक(अंतिम) आणि यमलोकगमन(याम्यज) ही चार प्रकारची संकटे  असतात.

श्री गणेश कोशानुसार या चार संकटातून मुक्त होण्याकरिता गणेशांनी संकष्ट चतुर्थीचे व्रत सांगितले आहे. श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते.

संकष्ट चतुर्थीचे व्रत स्त्री-पुरुष कोणीही करू शकते. हे व्रत मिठाची संकष्ट चतुर्थी किंवा पंचामृत चतुर्थी या प्रकारे केले जाऊ शकते. व्रताचा कालावधी आमरण, 21 वर्ष किंवा 1 वर्ष असा आहे.

या व्रतात दिवसभर उपवास करावा लागतो. चंद्रोदय झाल्यानंतरच चंद्राला व गणपतीला नैवेद्य दाखवून उपवास सोडविला जातो.

मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी असे म्हटले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची असते कारण ती 21 वर्षातून एकदाच येत असते.

हे व्रत करत असताना विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार संतती प्राप्तीसाठीही संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते.