दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जात असतो. यावर्षी "आमची जमीन" या घोषवाक्याखाली जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जाणार आहे.
2024 च्या जागतिक पर्यावरण दिनाचे जागतिक समारंभ सौदी अरेबिया आयोजित करत आहे. यावर्षी जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता यावर लक्ष असेल.
जागतिक पर्यावरण दिन हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असून प्रथम 1973 मध्ये साजरा केला गेला होता. पर्यावरणाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो.
जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश हा पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कृती करण्यास प्रोत्साहित करणे आहे.
मानवी लोकसंख्येत झपाट्याने होणारी वाढ, वाढते शहरीकरण, बदलते तंत्रज्ञान इत्यादी अनेक आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणास हानी पोहोचत आहे.
वाढते प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, नद्या व समुद्राचे होणारे वाढते प्रदूषण, वन्यजीव आणि जंगलांचे संरक्षण इत्यादी अनेक पर्यावरणाच्या समस्या आपल्या पृथ्वी ग्रहावर भेडसावत आहे.
हवामानातील बदल हा पृथ्वीवरील जीवनासाठी सर्वात मोठा धोका असून, वाढते तापमान, समुद्राची वाढती पातळी, बेमोसमी पाऊस, पिण्याच्या पाण्याची कमतरता इत्यादी समस्या आपल्यासमोर उभा आहेत.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पृथ्वीवरील प्रत्येक नागरिकाने पर्यावरण व निसर्गाच्या संरक्षणासाठी आपआपल्या परीने योगदान देणे महत्त्वाचे आहे.
झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, माझे शहर स्वच्छ शहर सुंदर शहर, इत्यादी घोषवाक्य फक्त कागदावर किंवा जाहिरातीत पुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात कृतीत परिवर्तित्व होणे गरजेचे आहे.